सिरोंचा (प्रतिनिधी) : मौजा गोलागुडम माल येथील वन विभागाच्या सर्व्हे क्रमांक ४९३ मधील जमिनीवरून निर्माण झालेल्या संभ्रमाबाबत गोलागुडम व सुनकरअल्ली परिसरातील नागरिकांनी २५ ऑगस्ट २०२६ रोजी सिरोंचा तहसीलदारांना निवेदन सादर केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी, नगरसेवक सतीश भाऊ बोगे, युवा सेना तालुका प्रमुख प्रशांतभाऊ नस्कुरी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रवि सुलतान यांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले. संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सर्वांना समान न्याय देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गोलागुडम येथील वन विभागाच्या मालकीच्या सदर जागेचा वापर सन १९८६ पासून दरवर्षी पूरपरिस्थितीत नागरिकांकडून तात्पुरता निवारा घेण्यासाठी केला जात आहे. मात्र, २१ ऑगस्ट २०२६ रोजी वन विभागाने काही व्यक्तींनी अतिक्रमण केल्याच्या कारणावरून सर्व्हे क्रमांक ४९३ मधील जमिनीची मोजणी केली. अचानक झालेल्या या मोजणीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.निवेदनात अतिक्रमण नेमके कोणत्या ठिकाणी, किती क्षेत्रावर आणि कोणत्या हद्दीत आहे, याचा स्पष्ट तपशील देण्यासोबतच मोजणी नकाशा व पंचनाम्याची प्रत उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.तसेच संबंधित व्यक्ती सन २००५ पूर्वीपासून या जागेवर वास्तव्यास आहेत किंवा शेती करीत आहेत का, याची वस्तुनिष्ठ चौकशी करून जुने शासकीय अभिलेख व उपलब्ध पुराव्यांची तपासणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.सर्वांना समान न्याय मिळावा, ही ग्रामस्थांची प्रमुख मागणी आहे. जर नियमांनुसार काही व्यक्तींना सदर जागेचा लाभ अथवा जागा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू असेल, तर त्याच निकषांनुसार संपूर्ण गावातील पात्र नागरिकांचाही विचार करण्यात यावा. केवळ निवडक व्यक्तींना लाभ न देता संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबवावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.पूरपरिस्थितीत नागरिकांना सुरक्षित निवारा मिळण्यासाठी या जागेचा उपयोग लक्षात घेऊन प्रशासनाने योग्य नियोजन करावे आणि नागरिकांना विनाकारण त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.या संपूर्ण प्रकरणाची प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, नियमांनुसार योग्य ती कार्यवाही करावी आणि सर्व पात्र नागरिकांना समान न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
हिंदू एकता पोर्टल







