सिरोंचा/प्रतिनिधी दि 04/10/2026 :- सिरोंचा शहरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून, या काळात मंदिर परिसर, मुख्य रस्ते, चौक, बाजारपेठ तसेच विविध सार्वजनिक ठिकाणी रात्रीच्या वेळी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ राहणार आहे. मात्र, शहरातील अनेक भागांमध्ये पथदिवे बंद असून काही ठिकाणी दिवे नादुरुस्त अवस्थेत आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना अंधारातून मार्गक्रमण करावे लागत आहे. नवरात्रोत्सवासारख्या महत्त्वाच्या धार्मिक उत्सवाच्या काळात शहरातील सार्वजनिक प्रकाश व्यवस्था अपुरी राहणे ही गंभीर बाब आहे. अंधारामुळे नागरिकांची गैरसोय होण्याबरोबरच रस्ते अपघात, चोरी तसेच इतर अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रात्री उशिरापर्यंत ये-जा करणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पुरेशी प्रकाश व्यवस्था असणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे नवरात्रोत्सव सुरू होण्यापूर्वीच नगरपंचायतीने शहरातील सर्व पथदिव्यांची तातडीने पाहणी करून बंद व नादुरुस्त पथदिवे दुरुस्त करावेत. तसेच ज्या ठिकाणी प्रकाश व्यवस्था अत्यंत कमी आहे, त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार नवीन पथदिवे बसवावेत. नगरपंचायतीने या विषयाकडे केवळ नियमित देखभालीचा विषय म्हणून न पाहता नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित अत्यावश्यक बाब म्हणून तातडीने कार्यवाही करावी, ही अपेक्षा आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात सिरोंचा शहर अंधारात नव्हे, तर सुरक्षित आणि प्रकाशमय वातावरणात दिसावे, यासाठी तातडीने ठोस कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी धर्मराव विद्यालयाचा माजी विद्यार्थ्यांनी निवेदन द्वारे केली आहे नगरपंचायत चा मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करताना धर्मराव विद्यालयाचा माजी विद्यार्थी श्री किरण संगेम,श्री श्रीनाथ पडिशालवार,श्री महेश मादेशी,श्री राजू कोंड्रा,श्री पोरन्ला गट्टू आदी उपस्थित होते.








