सिरोंचा (प्रतिनिधी) दि. 6 ऑगस्ट : सिरोंचा तालुक्यातील नारायणपूर ते भोगपूर दरम्यान असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३-सी वर वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी तातडीने गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसविण्याची मागणी केली आहे. याबाबत नारायणपूर व भोगपूर येथील ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार, सिरोंचा यांच्या मार्फत जिल्हाधिकारी, गडचिरोली यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नारायणपूर ते भोगपूर दरम्यानचा सुमारे अर्धा किलोमीटरचा रस्ता गावाच्या वस्तीतून जात असून या मार्गावर दिवसभर वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. गेल्या चार दिवसांत या ठिकाणी दोन गंभीर अपघात घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या अपघातांपैकी एका अपघातात लिंगाय्या नावाच्या व्यक्तीचे दोन्ही पाय तुटून ते गंभीर जखमी झाले आहेत, तर दुसऱ्या अपघातात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे या मार्गावरील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.या मार्गावर दररोज शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने ये-जा करीत असल्याने अपघाताचा धोका कायम आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, नारायणपूर व भोगपूर गावांच्या प्रवेशद्वाराजवळील रस्ता सरळ असल्यामुळे अनेक वाहनचालक भरधाव वेगाने वाहने चालवतात. त्यामुळे गावात प्रवेश करतानाही वाहनांचा वेग कमी होत नसल्याने अपघातांची शक्यता वाढत आहे.या पार्श्वभूमीवर नारायणपूर व भोगपूर गावांच्या प्रवेशद्वाराजवळ तातडीने गतिरोधक उभारण्यात यावेत, तसेच “शाळा/गाव आहे, गती कमी करा” असे सूचनाफलक लावण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यासोबतच संबंधित राष्ट्रीय महामार्ग विभागाला तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशीही विनंती निवेदनातून करण्यात आली आहे.या निवेदनावर राजबापू नूकुम, राजन्ना कडेकरी, साई ताल्ला, वसंत डूरके, राजू अन्नेला यांच्यासह नारायणपूर व भोगपूर येथील अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
हिंदू एकता पोर्टल ✍️







