मुख्य संपादक : श्री सदानंद इंगिली
सिरोंचा तालुका, दि. 20 जून 2026 :अंकिसा ग्रामपंचायत हद्दीतील हिंदू समाजासाठी प्रस्तावित असलेल्या हिंदू स्मशानभूमी (वैकुंठ धाम) बांधकामाच्या कामास होत असलेल्या विलंबामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. हिंदू समाजासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या या प्रकल्पाचे भूमिपूजन व शंकूस्थापना दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात पार पडले होते. त्यावेळी लवकरच बांधकामास प्रारंभ होऊन वैकुंठ धामाचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली होती.मात्र शंकूस्थापनेनंतर जवळपास पाच महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्मशानभूमीच्या अभावामुळे अंत्यसंस्काराच्या वेळी नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे या कामास प्राधान्य देऊन तातडीने सुरुवात करावी, अशी मागणी सातत्याने होत आहे.याच पार्श्वभूमीवर दिनांक 18 जून 2026 रोजी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल, अंकिसा यांच्या वतीने मा. तहसीलदार साहेब, सिरोंचा तसेच मा. गटविकास अधिकारी, पंचायत समिती सिरोंचा यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे हिंदू स्मशानभूमीसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याची तसेच मंजूर झालेल्या वैकुंठ धामाचे बांधकाम तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वैकुंठ धाम ही केवळ विकासकामाची योजना नसून हिंदू समाजाची अत्यंत महत्त्वाची आणि मूलभूत गरज आहे. ग्रामस्थांच्या धार्मिक भावना व सामाजिक गरजा लक्षात घेऊन प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने पाहावे. तसेच सर्व आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून बांधकामास लवकरात लवकर सुरुवात करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा व्यक्त केली असून, संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करून रखडलेले काम मार्गी लावावे, अशी मागणी केली आहे. ग्रामस्थांनाही आता प्रशासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा लागली असून वैकुंठ धामाचे बांधकाम लवकर सुरू होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.निवेदन देताना उपस्थित:विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच अंकिसा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.







