सिरोंचा ( प्रतिनिधी ): सिरोंचा तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना सध्या लागू असलेली प्रति एकर १२.६० क्विंटल धान खरेदीची मर्यादा वाढवून २० क्विंटल करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन सिरोंचा तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आले.
सिरोंचा तालुका हा महाराष्ट्र–छत्तीसगड–तेलंगणा सीमेवर असून धान हे येथील प्रमुख पीक आहे. गोदावरी व प्राणहिता नदीच्या परिसरातील सुपीक जमिनीमुळे तसेच सुधारित वाणांच्या वापरामुळे शेतकऱ्यांना एकरी २२ ते २८ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मात्र शासनाच्या धान खरेदी केंद्रावर प्रति एकर केवळ १२.६० क्विंटल धानाची खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात धान शिल्लक राहत आहे.
शिल्लक धान खासगी व्यापाऱ्यांना १७०० ते १९०० रुपये प्रति क्विंटल दराने विकावे लागत असून, शासनाचा आधारभूत दर २४४१ रुपये असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच शेजारील छत्तीसगडमध्ये प्रति एकर २० क्विंटल खरेदी केली जाते, तर तेलंगणात खरेदीवर मर्यादा नसल्याचा दाखला देत सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांनाही त्यांच्या संपूर्ण उत्पादनाचा योग्य मोबदला मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
त्यामुळे सिरोंचा तालुक्यातील धान खरेदीची मर्यादा तात्काळ १२.६० वरून २० क्विंटल प्रति एकर करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदार, सिरोंचा यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
यावेळी राष्ट्रीय किसान परिषद सिरोंचा तालुका उपाध्यक्ष रजबापू नुकूम, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद सिरोंचा तालुका अध्यक्ष सदानंद येलय्या इंगिली, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद गडचिरोली जिल्हा कार्याध्यक्ष नरसिंग सिलवेरी यांच्यासह साई तल्ला, अशोक इंगिली, वेंकन्ना भीमकरी, राजू रापेली व राजशेखर भीमकरी आदी उपस्थित होते.








