सिरोंचा (प्रतिनिधी )०८/०७/२०२६:-सिरोंचा नगरपंचायत हद्दीतील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, कमी-जास्त दाबाची समस्या तसेच विविध प्रभागांमध्ये सुरू असलेल्या विद्युत दुरुस्ती व देखभाल कामांच्या पार्श्वभूमीवर आज नगराध्यक्ष पद्मा सत्यनारायण भोगे, पाणीपुरवठा सभापती पद्मा भगवान पिल्लीवार तसेच नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने महावितरण कार्यालयाला भेट दिली.
यावेळी महावितरणचे अभियंता दिनेश सिडाम यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. नगरपंचायत हद्दीतील नागरिकांना वारंवार भेडसावणाऱ्या वीजपुरवठा खंडित होणे, लाईट ये-जा करणे, कमी दाबाचा वीजपुरवठा, तसेच काही भागातील प्रलंबित देखभाल व दुरुस्ती कामांबाबत नगरसेवकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.
शिष्टमंडळाने नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन संबंधित समस्या तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. यावर अभियंता दिनेश सिडाम यांनी आवश्यक त्या उपाययोजना करून वीजपुरवठा अधिक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले.
या भेटीदरम्यान लोकमतचे पत्रकार नागभूषण चकिनारपूवार यांच्यासह नगरसेवक रंजीत नागेश्वर गागापुरवार व इतर नगरसेवक,सामाजिक कारकर्ते भगवान पिल्लीवर तसेच महावितरणचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
“सिरोंचा शहरातील नागरिकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा मिळावा, यासाठी नगरपंचायत स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे,” असे यावेळी नगराध्यक्ष पद्मा भोगे यांनी सांगितले.






