नेलगुंडा (ता. भामरागड), दि. ५ जुलै २०२६ :भामरागड तालुक्यातील नेलगुंडा पोलिस स्टेशन परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या श्री हनुमान मंदिरात श्री हनुमान व श्री गणेश मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठेचा भव्य धार्मिक सोहळा दिनांक २ व ३ जुलै २०२६ रोजी अत्यंत भक्तिमय, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या धार्मिक सोहळ्याचे आयोजन नेलगुंडा पोलिस स्टेशनच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमास परिसरातील भाविक, ग्रामस्थ, पोलीस अधिकारी, जवान तसेच जिल्हा पोलीस, सीआरपीएफ व एसआरपीएफचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित भाविकांनी श्री हनुमान व श्री गणेशाचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.कार्यक्रमाची सुरुवात २ जुलै रोजी श्री हनुमान व श्री गणेश मूर्तींच्या भव्य मिरवणुकीने झाली. गावातून काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत “जय श्रीराम”, “जय हनुमान” आणि “गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात मिरवणूक पार पडली.दिनांक ३ जुलै रोजी वैदिक मंत्रोच्चारात शास्त्रोक्त पद्धतीने प्राणप्रतिष्ठा, होमहवन, पूजन-अर्चन, आरती तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, गडचिरोली जिल्हा कार्याध्यक्ष श्री. नरसिंहा सिलवेरी यांच्या हस्ते वेदपंडितांच्या मार्गदर्शनाखाली प्राणप्रतिष्ठेचा विधी संपन्न झाला. भाविकांनी मोठ्या श्रद्धा व भक्तिभावाने धार्मिक विधींमध्ये सहभाग घेतला.या सोहळ्यास प्रभारी अधिकारी विक्रम बुरंगे साहेब, पोलीस उपनिरीक्षक अजिंक्या इथापे साहेब, कुंभार साहेब (एसी, सीआरपीएफ), जिल्हा पोलीस दल, सीआरपीएफ, एसआरपीएफचे अधिकारी व अंमलदार तसेच नेलगुंडा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, गडचिरोली जिल्हा कार्याध्यक्ष श्री. नरसिंहा सिलवेरी आणि ज्येष्ठ लोकमत पत्रकार श्री. नागभूषणम चकिनारपुवार यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली.यावेळी उपस्थित मान्यवरांनी हिंदू धर्म, भारतीय संस्कृती आणि सामाजिक ऐक्य जपण्यासाठी अशा धार्मिक उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. समाजात धार्मिक जागृती, सेवा, संस्कार आणि संघटन अधिक बळकट करण्यासाठी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल स्थानिक नागरिकांनी नेलगुंडा पोलिस स्टेशन, पोलीस प्रशासन, सुरक्षा दल तसेच या धार्मिक सोहळ्यास सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.


