सिरोंचा (प्रतिनिधी) | दि. ७ सप्टेंबर २०२६ :सिरोंचा येथील प्राणहिता नदीच्या तीरावर वसलेल्या पुरातन श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थानात श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात पार पडले. यावेळी मंदिरात भजनाचा कार्यक्रम, श्रीकृष्ण जन्मसोहळा तसेच श्रीकृष्ण उत्सवमूर्तीचा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांना पुरुष व महिला भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.शुक्रवारी (दि. ४ सप्टेंबर) रात्री ९ ते १२ वाजेपर्यंत भजन मंडळींच्या वतीने भक्तिमय भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. विविध भक्तिगीते व अभंगांच्या सादरीकरणामुळे मंदिर परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले. रात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्माचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. श्रीकृष्ण जन्माची वेळ होताच भाविकांनी जयघोष करीत आनंद व्यक्त केला.यानंतर शनिवारी (दि. ५ सप्टेंबर) सायंकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत श्रीकृष्ण उत्सवमूर्तीचा भव्य पालखी सोहळा पार पडला. मंदिर परिसरातून पालखी मिरवणुकीस सुरुवात झाली. मंगल वाद्यांच्या गजरात पालखीने सिरोंचा शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत छोटा बाजार परिसरातून पुन्हा मंदिराकडे प्रस्थान केले.पालखी मिरवणुकीदरम्यान मार्गावरील अनेक कुटुंबांनी उत्स्फूर्तपणे पालखीचे स्वागत केले. भाविकांनी पालखीची आरती करून श्रीकृष्ण उत्सवमूर्तीचे पूजन केले. ठिकठिकाणी भक्तिभावाने स्वागत करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. ‘श्रीकृष्णाचा जयजयकार’ आणि भक्तिगीतांच्या गजराने सिरोंचा शहर भक्तिमय झाले.श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. शिवाजी तोटावार यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली हे सर्व धार्मिक कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुरली सेनिगारपु, राजन्ना पानेम, श्रीनिवास इम्माडी यांच्यासह मंदिराशी संबंधित कार्यकर्ते व भाविकांचे सहकार्य लाभले.श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आयोजित या धार्मिक सोहळ्यामुळे सिरोंचा परिसरात श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. पारंपरिक धार्मिक उपक्रमांमधून भाविकांनी श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा आनंद घेतला.








