सिरोंचा (प्रतिनिधी ) : श्री कौंडिण्य महर्षी गौड कलार समाज संघटना, सिरोंचा यांच्या वतीने तालुक्यात प्रथमच सरदार सर्वाय पपन्ना गौड महाराज यांची ३७६ वी जयंती श्रद्धा व उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित समाजबांधवांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.कार्यक्रम श्री. नारायण गौड सिलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच श्री नागेश गौड अरिगेला व श्री स्वामी गौड बोंगोनी यांच्या प्रयत्नातून आयोजित करण्यात आला. यावेळी समाज संघटन, एकता आणि सामाजिक विकासाच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यात आले.श्री दामोदरजी अरिगेला यांनी समाजाच्या प्रगतीसाठी वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून संघटित होण्याचे आवाहन केले. प्रत्येक कुटुंब व युवकांना संघटनेशी जोडण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.श्री विजयकुमार राजू बोंगोनी व श्री स्वामी मोंडी बोंगोनी यांनी सरदार सर्वाय पपन्ना गौड महाराज यांच्या जीवनकार्य, शौर्य व संघर्षाची माहिती देत युवकांनी महापुरुषांचा इतिहास जाणून घेऊन तो पुढील पिढीपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन केले.या निमित्ताने समाजातील प्रत्येक कुटुंबाला संघटनेशी जोडणे, शिक्षण, सामाजिक विकास व समाजसेवेसाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा संकल्प करण्यात आला. तालुक्यात सुरू झालेली ही संघटनात्मक चळवळ समाजाच्या एकजुटीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.








