सिरोंचा / नारायणपूर (प्रतिनिधी): सिरोंचा तालुक्यातील करसपल्ली ते सिरोंचा या शॉर्टकट मार्गावरील मुख्य नाल्याजवळील रस्ता पूर्णपणे उखडल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या नाल्यावर पूल नसल्यामुळे ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला होता. अखेर प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे त्रस्त झालेल्या नारायणपूर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि स्थानिक युवकांनी श्रमदानातून नाल्याजवळील रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती केली.करसपल्ली आणि सिरोंचा दरम्यान असलेल्या या नाल्याला पावसाळ्यात मोठा पूर येतो. त्यामुळे दोन्ही गावांचा संपर्क तुटतो. शाळकरी मुले, गर्भवती महिला, शेतकरी तसेच इतर नागरिकांना जीव धोक्यात घालून हा नाला पार करावा लागतो. त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरूपी पूल उभारण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे.टेंडर झाल्याची चर्चा; मात्र पूल अद्यापही नाही!या नाल्यावर पूल बांधण्यासाठी यापूर्वी अनेकदा टेंडर प्रक्रिया झाल्याची चर्चा परिसरात आहे. मात्र, प्रत्यक्षात पुलाचे काम सुरू झालेले दिसत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. टेंडर प्रक्रिया आणि निधी मंजुरीबाबत चर्चा होत असताना प्रत्यक्ष काम का होत नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित विभागाने या प्रकरणाची चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणीही होत आहे.युवकांचे श्रमदान; प्रशासनाला कायमस्वरूपी पुलासाठी साकडेपूल उभारण्यासाठी वारंवार निवेदने देऊनही प्रश्न सुटत नसल्याने नारायणपूर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक युवकांनी एकत्र येत नाल्याजवळ मुरूम, दगड आणि माती टाकून रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती केली. या उपक्रमामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, ही तात्पुरती व्यवस्था असून कायमस्वरूपी पुलाची गरज कायम आहे.“टेंडर झाल्याचे आम्ही दरवर्षी ऐकतो; मात्र प्रत्यक्षात पूल काही दिसत नाही. जोपर्यंत शासन कायमस्वरूपी पूल बांधत नाही, तोपर्यंत आम्हालाच हा रस्ता दुरुस्त करावा लागत आहे. संबंधित विभागाने या समस्येची गंभीर दखल घेऊन तातडीने पुलाचे बांधकाम सुरू करावे,” अशी मागणी स्थानिक युवकांनी केली.या श्रमदान उपक्रमात नारायणपूर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अशोक हरी, संपत दाया, संपत हरी, राजन्ना कडेकरी, राजबापू नुकूम, महेश तोम्बरा, संपत हरी, चंद्रशेखर चेंमकारी यांच्यासह इतर युवकांनी सहभाग घेतला. युवकांनी पुढाकार घेऊन केलेल्या या कामाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.तात्पुरत्या दुरुस्तीने प्रश्न सुटणार नाही; करसपल्ली–सिरोंचा मार्गावरील या नाल्यावर कायमस्वरूपी पूल बांधून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.








