सिरोंचा( प्रतिनिधी), दि. ४ ऑगस्ट : खरीप हंगाम २०२६ अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी १० ऑगस्ट २०२६ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे सिरोंचा तालुक्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी अंतिम दिवसाची प्रतीक्षा न करता त्वरित पीक विम्याचा अर्ज भरून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी श्री. चेतन पाणबुडे यांनी केले आहे.यंदाच्या खरीप हंगामात अनेक भागांत समाधानकारक पाऊस झाल्यामुळे पेरणी व पिकांची वाढ चांगली झाली असली, तरी अतिवृष्टी, पूर, वादळी वारे, दुष्काळ, कीड व रोगांचा प्रादुर्भाव यांसारख्या नैसर्गिक संकटांचा धोका कायम असतो. अशा अनपेक्षित परिस्थितीत पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने केंद्र शासनामार्फत प्रधानमंत्री पीक विमा योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.शेतकऱ्यांनी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे, आधार कार्ड, बँक पासबुक, सातबारा उतारा, पेरणीची माहिती व इतर आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत. अर्ज महा-ई-सेवा केंद्र, सीएससी केंद्र, संबंधित बँक किंवा शासनाच्या अधिकृत ऑनलाइन पोर्टलद्वारे सादर करता येणार आहे.अंतिम मुदतीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी, सर्व्हरवरील तांत्रिक अडचणी किंवा इतर कारणांमुळे अर्ज भरण्यात विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोणताही धोका न पत्करता शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पीक विम्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे श्री. चेतन पाणबुडे यांनी स्पष्ट केले.सिरोंचा तालुक्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत वेळेत सहभागी होऊन आपल्या पिकांचे आर्थिक संरक्षण सुनिश्चित करावे आणि शासनाच्या या महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.







