सिरोंचा तालुक्यातील अमरादी शासकीय धान खरेदी केंद्रात धान खरेदीचे निर्धारित उद्दिष्ट पूर्ण झाल्याने पुढील धान खरेदीची प्रक्रिया ठप्प झाली आहे. उद्दिष्ट मर्यादा संपल्यामुळे धान खरेदीसाठी वापरण्यात येणारे मोबाईल ॲपही पुढील नोंदणी व बिल तयार करण्यासाठी सुरू होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांचे धान खरेदी होऊनही त्यांची बिले तयार होऊ शकत नाहीत. यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत असून प्रशासनाने तातडीने १० हजार क्विंटल अतिरिक्त उद्दिष्ट मंजूर करून धान खरेदीस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.सध्या धान खरेदीची अंतिम मुदत 30 जून 2026 रोजी संपत असल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. अनेक शेतकऱ्यांचे धान खरेदी केंद्रावर उपलब्ध असतानाही उद्दिष्ट मर्यादा संपल्यामुळे खरेदी प्रक्रिया व बिल निर्मिती थांबली आहे. परिणामी शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या हमीभावाचा लाभ वेळेत मिळण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, अमरादी केंद्रावर मोठ्या प्रमाणात धान विक्रीसाठी आले असून विद्यमान उद्दिष्ट अपुरे पडले आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ १० हजार क्विंटल अतिरिक्त खरेदीचे उद्दिष्ट मंजूर करावे. तसेच 30 जूननंतरही सर्व पात्र शेतकऱ्यांचे धान खरेदी होईपर्यंत धान खरेदीची मुदत वाढवावी.शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे की, उद्दिष्ट वाढविण्याबाबत आणि मुदतवाढीबाबत त्वरित निर्णय न झाल्यास अनेक शेतकरी शासनाच्या हमीभाव योजनेपासून वंचित राहतील आणि त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागेल.यामुळे संबंधित विभागाने तातडीने हस्तक्षेप करून अमरादी सोसायटीस १० हजार क्विंटल अतिरिक्त उद्दिष्ट मंजूर करावे, मोबाईल ॲपवरील बिल निर्मिती प्रक्रिया पूर्ववत सुरू करावी आणि धान खरेदीची मुदत वाढवावी, अशी जोरदार मागणी अमरादी परिसरातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.







