कारसपल्ली (ता. सिरोंचा) : गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे सिरोंचा तालुक्यातील कारसपल्ली परिसरात धान रोवणीच्या कामांना मोठा वेग आला आहे. शेतांमध्ये पाणी साचल्याने शेतकऱ्यांनी रोवणीला सुरुवात केली असून सर्वत्र लगबगीचे वातावरण निर्माण झाले आहे.धान रोवणीच्या हंगामामुळे ग्रामीण भागातील महिलांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला आहे. ऑगस्ट महिनाभर त्यांना नियमित काम मिळत असल्याने त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्नातही भर पडत आहे. महिला दररोज सकाळी सुमारे ८ वाजल्यापासून सायंकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत पावसाची पर्वा न करता शेतात मेहनत घेत आहेत.भर पावसातही महिला आनंदाने एकत्रितपणे धान रोवणीचे काम करतात. काम करताना त्या पारंपरिक गीते गातात, एकमेकींना साथ देतात आणि उत्साहपूर्ण वातावरणात रोवणीचा जणू उत्सवच साजरा करतात. त्यामुळे शेतामध्ये श्रम, संस्कृती आणि एकोप्याचे सुंदर दर्शन घडत आहे.सध्या कारसपल्ली परिसरातील बहुतांश शेतांमध्ये धान रोवणीची कामे सुरू असून, वेळेवर झालेल्या पावसामुळे यंदाच्या खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांमध्ये आशादायक वातावरण आहे. चांगले उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
हिंदू एकता पोर्टल
मुख्य संपादक : श्री सदानंद येलय्या इंगिली


