सिरोंचा तालुका, दि. २१ जून २०२६ :
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अंकिसा येथील श्रीनिवास हायस्कूलच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने योग दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक तसेच विविध सामाजिक व धार्मिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री किशनराव सर उपस्थित होते. त्यांनी योगाचे महत्त्व, त्याचे शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना विविध योगासने, प्राणायाम व ध्यानाच्या पद्धतींचे प्रात्यक्षिक करून नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन केले.
तसेच श्री लांछनी सर यांनीही योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व स्पष्ट करत निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवनासाठी योग हा सर्वोत्तम मार्ग असल्याचे सांगितले. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे उपस्थितांमध्ये योगाविषयी जागरूकता निर्माण झाली.
या कार्यक्रमात विश्व हिंदू परिषद, अंकिसा ग्राम समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्रितपणे योगाभ्यास करून निरोगी जीवन जगण्याचा संकल्प केला.
यावेळी वक्त्यांनी सांगितले की, भारताने संपूर्ण जगाला योगाचे अमूल्य वरदान दिले आहे. हजारो वर्षांपूर्वी ऋषी-मुनी आणि आदियोगी भगवान शिव यांनी दिलेली ही महान परंपरा आज जगभरातील लोकांना आरोग्य, शांती आणि आत्मबलाचा संदेश देत आहे. योग हा केवळ व्यायाम नसून भारताच्या महान सनातन संस्कृतीचे, आध्यात्मिक ज्ञानाचे आणि मानवकल्याणाच्या विचारांचे प्रतीक आहे.
“योग ही भारताची ओळख असून, विश्वकल्याणाचा आधार आहे. चला, आपण सर्वांनी नियमित योग करून भारताची ही गौरवशाली परंपरा प्रत्येक घरापर्यंत पोहोचवूया,” असा संदेश कार्यक्रमाच्या शेवटी देण्यात आला.







