ता. सिरोंचा, दि. 21 जून 2026 जागतिक योग दिनानिमित्त आज रविवार, दि. 21 जून 2026 रोजी कारसपल्ली येथील आरोग्य उपकेंद्रात विशेष योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्त्या व अंगणवाडी सेविकांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात परिसरातील महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत विविध योगासने, प्राणायाम व ध्यान साधना केली. आरोग्य उपकेंद्राच्या परिसरात आयोजित या उपक्रमातून योगाचे महत्त्व आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यात आला. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक आरोग्य सुधारते, मानसिक तणाव कमी होतो तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते, असे मार्गदर्शन उपस्थितांना करण्यात आले.
यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांनी महिलांना संतुलित आहार, वैयक्तिक स्वच्छता, नियमित व्यायाम आणि आरोग्याची काळजी घेण्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. निरोगी शरीर आणि निरोगी मनासाठी योग हा सर्वोत्तम मार्ग असून प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावा, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान महिलांनी विविध योगासनांचे प्रात्यक्षिक सादर करून योगाबाबत जनजागृती केली. उपस्थित सर्वांनी योगाचे महत्त्व समजून घेत नियमित योगाभ्यास करण्याचा संकल्प केला.
या कार्यक्रमामुळे आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली असून उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.

