कारसपल्ली (ता. सिरोंचा), दि. ३ ऑगस्ट २०२६ :सिरोंचा तालुक्यातील कारसपल्ली गावाजवळ आज (दि. ३ ऑगस्ट) सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या दरम्यान झालेल्या भीषण रस्ते अपघातात शंकर लस्मैय्या हरी (वय ५५) या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे कारसपल्ली गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून मृताच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.प्राथमिक माहितीनुसार, लखनऊ येथून चेन्नईकडे जात असलेली टाटा कंपनीची नव्याने तयार करण्यात आलेली ‘मार्कोपोलो (Marcopolo)’ बस कारसपल्ली मार्गावरून जात होती. ही बस गंतव्यस्थानी पोहोचविण्यासाठी नेण्यात येत होती. बसमध्ये कोणतेही प्रवासी नसून चालक एकटाच बस चालवत होता.दरम्यान, शंकर लस्मैय्या हरी हे सकाळी शेतीच्या कामासाठी जात असताना बसची जोरदार धडक बसल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. धडकेमुळे त्यांच्या कानातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ त्यांना उपचारासाठी दवाखान्यात हलविण्याचा प्रयत्न केला; मात्र उपचारासाठी नेत असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.विशेष म्हणजे, याच भोगापूर टर्निंग पॉईंटवर अवघ्या तीन दिवसांपूर्वी आणखी एक गंभीर अपघात झाला होता. त्या अपघातात कडेकरी लिंगय्या हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या हात-पायांना गंभीर दुखापत झाली होती. सलग घडलेल्या या दोन अपघातांमुळे भोगापूर टर्निंग पॉईंट हा अपघातप्रवण ठिकाण म्हणून समोर आला असून वाहनचालक आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.स्थानिक नागरिकांनी या धोकादायक वळणावर तातडीने वेगमर्यादा फलक, इशारा फलक, रंबल स्ट्रिप्स (स्पीड ब्रेकर), परावर्तित सूचना फलक तसेच इतर आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे, जेणेकरून भविष्यात अशा दुर्दैवी घटना टाळता येतील.
हिंदू एकता पोर्टल







